
>> वरद चव्हाण
अभिज्ञा भावे. काहींची शरीरयष्टी ही मुळातच दैवी देणगी असते. अभिज्ञाच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. पण तरीही व्यायाम आणि आहार जोडीला आहेतच.
नमस्कार फिटनेस फ्रिक्स! आजवर आपण अशा सेलिब्रेटिजचे लेख वाचत आलो आहोत जे एकतर खूप व्यायामासाठी क्रेझी आहेत किंवा खूप डाएट कॉन्शस आहेत. पण आज आपण एका अशा कलाकाराबद्दल वाचणार आहोत. जिला ना व्यायामाचं वेड आहे ना फार स्वतःच्या आहाराबद्दल जागरूक आहे. तरीही स्वतःच्या फिटनेसमुळे किंवा ग्लॅमरस लूकमुळे ती अनेक तरुणांच्या मनावर राज्य करून आहे. येस, शी इज नन अदर दॅन अभिज्ञा भावे.
लहानपणापासूनच तिला अजिबात व्यायामाची आवड नव्हती. अभिज्ञाने आधी एअर हॉस्टेस म्हणून करीअर करायचं ठरवलं. प्रत्येक एअर हॉस्टेसला स्वतःच वजन मेण्टेन ठेवावं लागतं. अभिज्ञाला स्वतःचं वजन 59-62 किलोपर्यंतच मर्यादित ठेवायचं होतं. अनेक वेळा तिचं वजन क्षमतेपेक्षा जास्त झाल्यामुळे तिला परवानगीसुद्धा मिळत नव्हती. पण तरीदेखील अभिज्ञाला आपण व्यायाम किंवा डाएट करून स्वतःचं वजन कमी करावं असं कधीच वाटलं नाही. मात्र व्यायामाबद्दलचा गंभीरपणा अभिज्ञाच्या आयुष्यात एका आजारामुळे आला. अभिज्ञाला स्लिप डिस्कचा त्रास झाला. आजारातून बाहेर पडल्यावर अभिज्ञाने व्यायामाचा आधार घ्यायचं ठरवलं. याची सुरुवात अर्थातच योगा आणि फिजिओथेरपीपासून झाली. मग हळूहळू जसा तिचा आत्मविश्वास वाढत गेला तसाच तिने व्यायामशाळेत जायचं ठरवलं. मात्र अजूनही तिला स्वतःच्या कंबरेवर जास्त जोर देऊन चालणार नव्हतं. यामुळेच तिने स्वतःला वेट ट्रेनिंगपासून लांब ठेवलं आणि जास्तीत जास्त भर कार्डिओ ट्रेनिंगवर दिला. या कठीण काळात मात्र प्रत्येकाला एक असा मित्र-मैत्रीण लागतोच जो आपल्याला व्यायामासाठी प्रेरणा देतो. अभिज्ञाच्या आयुष्यातले ते मित्र म्हणजेच सौरभ गोखले आणि अनुजा साठे. हे दोघंही व्यायामासाठी क्रेझी आहेत. अभिज्ञा या दोघांकडूनच व्यायामाची टिप्स आणि प्रेरणा घेत असे. अभिज्ञाने कधीच स्वतःसाठी पर्सनल ट्रेनर किंवा डाएटिशियन ठेवला नाही. आपल्या शरीराला होणारा त्रास किंवा एक स्त्री म्हणून त्यात होणारे बदल हे एक तिसरा माणूस समजून घेईल व त्यानुसार आपलं रुटीन सेट करू शकतो या गोष्टीवरच त्याचा विश्वास नाही. स्वतःचा व्यायाम आणि स्वतःचा आहार हा अभिज्ञाने स्वतःच ठरवला आहे. हे वय खाण्याचं आहे. या वयात डाएटची काहीच गरज नाही असं जरी तिला वाटत असलं तरी स्वतःच्या करीअरमुळे का होईना पण साखर, जंक फूड, फ्राईड फूड खाणं टाळते.
अभिज्ञा शुद्ध शाकाहारी आहे. घरून स्वतःचा जेवणाचा डबा त्या शूटवर नेणं पसंत करते. पण तरीही संध्याकाळचा सेटवर येणारा चमचमीत नाश्ता तिला खायला खूप आवडतो. याशिवाय दिवसभर ग्रीन टी पिणं हासुद्धा त्यांच्या आहाराचा एक भागच आहे. शेवटी काय आहे मित्र आणि मैत्रिणींनो, अभिज्ञा व्यायाम जरी कमी करत असली किंवा स्वतःच्या आहाराकडे फार लक्ष देत नसली तरी तिचं बॉडी पोश्चर क्रीनवर दिसतं तेच महत्त्वाचं नाही का? हे नटेश्वराचेच एक वरदान असावे. पण आपल्या सगळ्यांनाच हा वरदान लाभत नाही आणि म्हणूनच अभिज्ञा व्यायाम आणि डाएट न करता किती बारीक आहे. मग आपण का करायचा व्यायाम, असं म्हणून नाही चालणार. अभिज्ञाचा प्रवास संघर्षमय आहे हे विसरू नका. इतक्या लहान वयात स्लिप डिस्क होणं, आपण पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहू की नाही याची खात्री नसणं. त्यात स्वतःला सावरून अभिज्ञाने अभिनय क्षेत्रात स्वतःच्या नावामागे यशाचा टप्पा उमटवला. हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. त्यामुळे सांगतो, दीर्घकाळासाठी तुम्हाला एक चांगलं, निरोगी आयुष्य जगायचं असेल तर हा लेख वाचून झाल्यावर लगेच व्यायामाला सुरुवात करा.
[email protected]




























































