
सामना प्रतिनिधी । पणजी
मि. इंडियासारखा सुपर हिरोवर आधारित सिनेमा पुन्हा तयार होणार असेल तर तो करायला मला आवडेल, अशी इच्छा बुधवारी बॉलीवुड अभिनेता अनिल कपूरने इफ्फीमध्ये बोलून दाखवली. नायक सिनेमात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो. तशी संधी मिळाली एक दिवसाचा पंतप्रधानही होईन, असे सांगत अनिल कपूरने आज आपल्या चाहत्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला.
गोव्यात सुरू असलेल्या ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मास्टर क्लास वुईथ मि. इंडिया’ या सत्रात अभिनेता अनिल कपूरची मुलाखत त्यांची कन्या रिया कपूर हिने घेतली. आपल्या ३८ वर्षांच्या सिनेमा कारकिर्दीचा इतिहास या मुलाखतीतून उलगडला सांगितला. पुण्यातील एफटीआयआयसारख्या संस्थेतून अनेक कलाकार तयार झाले. मीही त्यातूनच तयार झालेला अभिनेता आहे, असे सांगून मी सिनेमासाठी काम शोधत गेलो नाही, उलट त्या भूमिकांसाठी माझा शोध घेतला गेला. कॅमेऱ्यायाला सामोरे जाण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी इंडस्ट्रीचा आभारी आहे.
या वयात देखील हॅण्डसम दिसणाऱ्या अनिल कपूर यांनी, कधी कधी स्वत:च्या लूकवर मेहनत घ्या, अन्यथा या इंडस्ट्रीतील लोक, लेखक, दिग्दर्शक आणि प्रेक्षकही तुम्हाला विसरू शकतात. तुम्ही फिट राहा, आनंदी राहा हाच तुमच्या यशाचा फॉर्म्युला आहे. मी आजही मॅरेथॉनमध्ये भाग घेतो. मी कामाला प्राधान्य देतो असा कानमंत्र उपस्थितांना दिला. सोनमबद्दल बोलताना अनिल कपूरने ती कामाच्या बाबतीत माझीच गुड कॉपी असल्याचे सांगितले. त्यानंतर आपल्या वडीलांबद्दल बोलताना रिया कपूर म्हणाली, माझे वडिल सर्वात हॉट आहेत. त्यासाठी तिने मैत्रीणींच्या मेसेजचे दाखले दिले. अनिल कपूर यांची कन्या रिया कपूर हिने मुलाखत घेताना तिच्या मैत्रिणींचे तिला आलेले मेसेज वाचून दाखवले. तिच्या मैत्रिणींनी तुझे वडील अजूनही हॉट आहेत असे मेसेज पाठविल्याचे रियाने सांगितले.
भविष्यात इंटिरियर डिझायनिंग, स्क्रीप्ट रायटिंग यासारख्या अनेक संधी मिळतील. मी एकदाच अभिनय करण्याचा प्रयत्न केला, पण मला बहिण सोनम इतके काम जमले नाही, अशी कबूली देखील तिने दिली. रिया म्हणाली, मला खायला खूप आवडते, वडिलांना अनेकदा ते आवडत नाही, पण कदाचीत मी एखादे रेस्टॉरंटही सुरु करेन.
नायक सिनेमात मुख्यमंत्री होतो, आता पंतप्रधान होईन
नायक सिनेमात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो. संधी मिळाली तर एक दिवसाचा पंतप्रधानही होईन असे उत्तर अनिल कपूरने देताच टाळ्यांचा कडकडाट झाला. थ्री इडियटससारख्या सिनेमातून पालकांनी विचार घ्यावा, मुलांना त्यांना हवे ते करु द्यावे असे सांगून माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी भाषण देणार नाही, कारण मी मनोरंजन करतो, परंतु भूतानसारख्या देशातील सर्वजण आनंदी आहेत. मी एक दिवसाचा पंतप्रधान झालो तर भारतातील सर्व लोक आनंदी असतील असे पाहीन, असे एका प्रश्नाला उत्तर देताना अनिल कपूर म्हणाला.



























































