ॐकार स्वरुपा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपलं आवडतं दैवत ? – शंकर

त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं ? -गंध उगाळून, अभिषेक घालून पूजा करायला आवडते.

संकटात तो तुम्हाला कशी मदत करतो, असं वाटतं ? – त्याची आठवण काढली की पाठबळ आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

कला आणि भक्तीची सांगड कशी घालता ? – रंगदेवता किंवा नटेश्वर म्हणून माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो आहेच. अनेक प्रसंगात मला त्याचा अनुभवही आलाय.

तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते ?– एकदा ‘गोरा कुंभार’ नाटकावेळी माझा आवाज बोलताही येईना एवढा बसला. प्रयोगही रद्द करावा लागणार होता. त्या क्षणी नटेश्वर सांभाळेल, असा विचार करून संवादासाठी मी तोंड उघडलं आणि आवाज मोकळा झाला. नाटक संपेपर्यंत तसाच होता. मेकअप उतरवल्यावर पुन्हा घसा बसला. तीन तासांसाठी नटेश्वराने मला सादरीकरणासाठी ताकद दिली.

आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग?– माझ्या शिरोडा गावाजवळ वेतोबा देवस्थान आहे. हे महादेवाचं रूप मानलं जातं. तिथे आम्ही आजारी असतानाही प्रयोग केला म्हणून तिथल्या पुजाऱयांनी मला आशीर्वादपर त्याच्या कमरेचा शेला दिला. तो मी घरून आणून देव्हाऱयाजवळ ठेवला. त्यानंतर माझा अपघात झाला तेव्हा माझ्या अंगावर एकही ओरखडा आला नाही. काही दिवसांनी मध्य प्रदेशातील एक गुरुजी भेटले. त्यांनी वेतोबाच्या शेल्याची आठवण करून दिली.

त्याच्यावर रागावता का ? – हो रागावतो. पण घाबरण्यापेक्षा त्याच्यावर प्रेम केलं तर तो जास्त जवळचा वाटतो.

आवडत्या दैवताचे कोणते स्वरूप आवडते? – त्याचं रौद्र स्वरूप जास्त आवडतं.

त्याच्यापाशी काय मागता ? -मला लोकांशी नीट वागण्याचा चांगुलपणा देत राहा. कारण लोकं जोडली तर तुम्ही लोकांच्या आयुष्यभर लक्षात राहतात.