
सामना प्रतिनिधी । श्रीवर्धन
श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर ड्रोनच्या सहाय्याने प्री वेडिंग शूट करताना पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात पर्यटकांना वाचवण्यासाठी ‘अदृश्य हात’ असल्याचे समोर आले आहे. या हुल्लडबाज पर्यटकांची बडदास्त राखण्यासाठी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या दिवसभर श्रीवर्धन पोलीस ठाण्यात फेऱ्या सुरू होत्या. त्यातच या प्रकरणातील आरोपी महिलांसह महागड्या गाड्या पोलिसांनी सोडून दिल्याने राजकीय दबावाच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.
श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर ड्रोनच्या सहाय्याने प्री वेडिंग शूट सुरू असताना चौकशी करण्यासाठी गेलेले श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांच्यासह इतर पोलिसांवर या पर्यटकांनी हल्ला केला. खेडेकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. हल्ला करणारे पर्यटक हे पुणे व संभाजीनगर येथील राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा श्रीवर्धनमध्ये रंगली होती. त्यातच आज श्रीवर्धन न्यायालयात व पोलीस ठाण्यात या आरोपींच्या मागेपुढे भाजपचेच पदाधिकारी फिरत असल्याने या वृत्ताला दुजोराच मिळाला. तर दुसरीकडे या दबावापोटी पोलिसांनी आरोपींच्या महागड्या गाड्या सोडून देत एकच गाडी ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींना श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
श्रीवर्धनवासीयांनी केला निषेध
या घटनेचा श्रीवर्धनवासीयांकडून निषेध व्यक्त केला जात असून आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत. तर राजकीय दबावापोटी पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा करू नये. अन्यथा पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर येईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
































































