
सामना ऑनलाईन, विशाखापट्टणम
महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने शुक्रवारी आयपीएलच्या फायनलमध्ये आठव्यांदा धडक मारली. या स्पर्धेतील ‘दादा’ संघ म्हणून ओळखल्या जाणाऱया चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करीत त्यांच्या पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. दीपक चहर, हरभजन सिंग, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहीर यांनी गोलंदाजीत चमक दाखवल्यानंतर शेन वॉटसन, फाफ डय़ुप्लेसिस या अनुभवी सलामीवीरांनी फलंदाजीत आपली धमक दाखवली आणि चेन्नई सुपरकिंग्जला अंतिम फेरीत पोहोचवले. आता येत्या रविवारी चेन्नई सुपरकिंग्जसमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे.
धावांचा पाठलाग करणाऱया चेन्नई सुपरकिंग्जने अवघे चार गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. फाफ डय़ुप्लेसिसने 39 चेंडूंत 50 धावांची आणि शेन वॉटसनने 32 चेंडूंत 50 धावांची खेळी साकारली. फाफ डय़ुप्लेसिसने एक षटकार व सात चौकारांची, तर शेन वॉटसनने चार षटकार व तीन चौकारांची आतषबाजी केली.



























































