#IPL2020 लिलावासाठी 332 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, ‘या’ खेळाडूंसाठी असणार चढाओढ

848

इंडियन प्रीमिअर लिग अर्थात आयपीएल 2020 ची तयारी सध्या जोरात सुरू आहे. आयपीएलच्या 13 व्या सत्रासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे खेळाडूंची बोली लागणार आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. ताज्या यादीनुसार लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा आकडा 332 पर्यंत खाली आणण्यात आला आहे.

आयपीएलच्या नव्या सत्रासाठी होणाऱ्या लिलावात 332 खेळाडूंवर बोली लागणार आहे. बुधवारी आयपीएल समितीने 639 खेळाडूंना लिलाव प्रक्रियेतून बाहेरचा रस्ता दाखवला आणि 971 पैकी 332 खेळाडूंची शॉर्टलिस्ट तयार केली आहे. या सर्व खेळाडूंची यादी आयपीएलमधील आठ फ्रँचाईजींकडे देण्यात आली आहे. अंतिम यादीमध्ये 19 खेळाडू आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले तर 24 नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. नव्या खेळाडूंमध्ये वेस्ट इंडीजचा केसिक विलियम्स, बांगलादेशचा मुशफिकूर रहीम आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झंपाचा समावेश आहे.

लिलावात हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये रॉबिन उथप्पा याची बेस प्राईज (दीड कोटी) सर्वात जास्त आहे. तर गेल्या दोन सत्रांमध्ये सर्वाधिक बोली लागलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट याची बेस प्राईज एक कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याची बेस प्राईज सर्वाधिक दोन कोटी रुपये आहे. या खेळाडूंना घेण्यासाठी प्रत्येक फ्रँचाईजींमध्ये चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

रॉबिन उथप्पा, जयदेव उनादकट, ग्लेन मॅक्सवेल, मुशफिकूर रहीम, अॅरॉन फिंच, पॅट कमिन्स यांना आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या