
ड्रग्ज लिंकप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या कार्यालयात चौकशीसाठी आणले. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस त्याची चौकशी केल्यावर कासकरला पुन्हा ठाणे जेलमध्ये पाठवले जाणार आहे.
गेल्या आठवडय़ात ‘एनसीबी’ने भिवंडीच्या अर्जुन टोल प्लाझा येथे कारवाई करून शबीर शेख आणि अहमद ताझाच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्या दोघांच्या चौकशीत इक्बाल कासकरचे नाव समोर आले होते. ड्रग्ज लिंक समोर आल्याने त्याची चौकशी ‘एनसीबी’ने सुरू केली. इक्बाल हा सध्या ठाणे जेलमध्ये असल्याने त्याच्या चौकशीसाठी ‘एनसीबी’ने पत्रव्यवहार केला. आज सकाळी ‘एनसीबी’चे पथक सक्वाअकराच्या सुमारास ठाणे जेलमध्ये गेले. पोलीस बंदोबस्तात इक्बालला जेलमधून ताब्यात घेऊन भिवंडी येथील न्यायालयात हजर केले. ट्रान्झिट प्रोडक्शन वॉरंटवर दुपारी पावणेतीनच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात इक्बालला ‘एनसीबी’च्या मुंबई कार्यालयात आणले गेले. इक्बालसाठी ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी खास प्रश्नावली तयार केली आहे. रात्री उशिरापर्यंत ‘एनसीबी’चे अधिकारी इक्बालची चौकशी करत होते. तर शनिवारी दुपारपर्यंत ‘एनसीबी’चे अधिकारी हे इक्बालची चौकशी करणार आहेत. चौकशी केल्यावर त्याला पुन्हा ठाणे जेलमध्ये पाठवण्यात येईल असे ‘एनसीबी’च्या सूत्रांनी सांगितले.



























































