
कोरोनाने नवा अवतार धारण केला आहे. नवा विषाणू अतिशय भयंकर आहे. वगैरे वगैरे. मात्र असे काहीही नाही. ना नवा कोरोना आलाय ना विषाणूत बदल झालाय. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास लोकांची बेपर्वाईच जबाबदार असल्याचे खडे बोल हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे प्रमुख डॉ. राकेश शर्मा यांनी सुनावले आहेत. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यामुळेच कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी या संस्थेत कोरोना विषाणूवर संशोधन करण्यात येत आहे. विशेषतः कोरोना विषाणूत होणाऱया बदलावर ही संस्था काम करते. सीरो सर्वेक्षणाचे महत्त्वाचे कामही याच संस्थेमार्फत करण्यात येते. या संस्थेचे प्रमुख डॉ. राकेश शर्मा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कोरोना संसर्ग फैलावण्यास लोकांच्या बेपर्वाईला जबाबदार ठरवले आहे.
ना नवा कोरोना आला असून ना नवा विषाणू. देशात आतापर्यंत कोरोनाचे 300 वेगवेगळे रूप बघायला मिळाले आहेत. परंतु त्यांची संसर्गक्षमता कमी आहे. सध्या वाऱयाच्या वेगाने जो संसर्ग फैलावतो आहे त्याला केवळ मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, गर्दी करणे हीच कारणे कारणीभूत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंदुस्थानात उन्हाळा अतिशय कठीण असतो. लोक दुपारी घरात असतात. एसी, कुलर चालवण्यात येतात. सायंकाळी लोक बाहेर पडतात. हा व्यवहार कोरोना फैलावण्यास पोषक आहे. कोरोनावर लस आली आहे. त्यामुळे आता काहीही होणार नाही असा समज लोकांनी करून घेतला आहे. त्यामुळेच संसर्ग फैलावत असल्याचे डॉ. राकेश शर्मा म्हणाले.




























































