शस्त्रास्त्रे आणि आश्रय देऊन ‘इसिस’च्या दहशतवाद्याला सापळ्यात अडकवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीत दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी अफगाणिस्तानातून आलेल्या इसिसच्या दहशतवाद्याला गुप्तचर यंत्रणांनी सापळा रचून अटक केली. त्याला सापळ्यात अडकवण्यासाठी शस्त्रास्त्र पुरवण्यापासून ते घर भाड्याने मिळवून देण्याचे काम गुप्तचर विभागाकडून करण्यात आले. अफगाणिस्तानातील इसिसच्या म्होरक्यांकडून त्याला सूचना येत होत्या. हा दहशतवादी सापळ्यात पूर्णपणे अडकल्याची खात्री झाल्यावर त्याला अटक करण्यात आली. दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट गुप्तचर यंत्रणांनी उधळून लावला आहे.

गुप्तचर यंत्रणांनी मेहनतीने आणि शिताफीने २० वर्षांच्या या दहशतवाद्याला जेरबंद केले आहे. गुप्तचर यंत्रणेचे हे मोठे यश आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. त्याची अधिकृत माहिती नुकतीच देण्यात आली.

अफगाणिस्तान, दुबई आणि नवी दिल्ली या ठिकाणी गुप्तचर यंत्रणा १८ महिने दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. अफगाणिस्तानमधून आलेल्या इसिसच्या या दहशतवाद्याला शस्त्रास्त्र पुरवण्यापासून ते त्याच्या राहण्यापर्यंतची सोय गुप्तचर यंत्रणेतर्फेच करण्यात आली होती. अशा प्रकारे सापळा लावून दहशतवाद्याला अटक करण्याची ही पहिलीच घटना आहे.

इसिसच्या १२ दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देऊन हिंदुस्थानची राजधानी नवी दिल्लीत आत्मघाती हल्ले करण्यासाठी पाठवण्यात आले होते. यातील एक दहशतवादी २० वर्षांचा असून त्याचे वडील अफगाणिस्तानातील मोठे व्यावसायिक असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्याने दिल्लीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीला महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये तो राहिला, नंतर लाला लजपतरायनगरमध्ये त्याने भाडय़ाने घर घेतले. दिल्लीतील अनेक ठिकाणांची रेकी करून त्याने हल्ल्याची तयारी सुरू केली. त्याच्या हालचालींवर गुप्तचर विभागाचे ८० जणांचे पथक लक्ष ठेवून होते. एका एजंटने त्याच्याशी जवळीक वाढवली होती.

या भागांची केली रेकी
दिल्ली विमानतळ, बाजारपेठा, मॉल्स, गर्दीची ठिकाणे या भागांची दहशतवाद्याने रेकी करून हल्ल्याची ठिकाणे ठरवली होती. दिल्लीत आणि देशात १२ ठिकाणी आत्मघाती हल्ले करण्याचा त्याचा डाव होता. गुप्तचर यंत्रणेने शिताफीने सापळा रचून तो उधळून लावला.

अमेरिकेला मिळाली महत्त्वाची माहिती
या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर अफगाणिस्तानात पाठवण्यात आले. तेथे अमेरिकेच्या बेस कॅम्पमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेचे पथक त्याच्या चौकशीसाठी आले होते. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अमेरिकेने कारवाई करून तालिबानच्या अनेक म्होरक्यांचा खात्मा केला.