दहशतवाद्यांनी दोघांना सोडताच इस्रायलने बॉम्बहल्ले वाढवले; युद्ध आणखी चिघळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 18 दिवसांपासून सुरु असलेले इस्रायल आणि हमासचे युद्ध भयानक वळणावर पोहोचले आहे. आज मंगळवारी दहशतवाद्यांनी 85 वर्षीय योचेव्ह लीफशीट्झ आणि 80 वर्षीय नुरत कुपर या दोन वृद्ध महिलांना सोडले. मात्र, दोन्ही महिलांचे पती अद्यापी हमासच्या ताब्यात आहेत. मिस्रच्या मध्यस्थीनंतर मानवतावादी दृष्टिकोनातून या महिलांना सोडल्याचे हमासने म्हटले आहे. मात्र, इस्रायलने त्यानंतर पुन्हा गाझापट्टीत बॉम्बहल्ले वाढवले. त्यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता असून रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र आहे. इमारतींच्या ढीगाऱ्यांखाली आणखी मृतदेह असण्याची शक्यता असून महामारी पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

इस्रायलने हवाईहल्ले वाढवले असून गाझापट्टीत घुसून हमासच्या तळांवर हल्ला चढवण्याच्या तयारीत इस्रायली सैनिक आहेत. 7 ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरु असून यात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.

पाणी, अन्न रोखले तर पॅलेस्टिनी कट्टरपंथी बनतील -बराक ओबामा
हमाससारख्या दहशतवादी संघटनेला संपवलेच पाहिजे. परंतु, मानवतेच्या दृष्टीने गाझापट्टीतील नागरिकांसाठी अन्नधान्य, पाणी आणि औषधांचा पुरवठा करायला. हे सर्व रोखले तर पॅलेस्टिनी आणखी कट्टरपंथी बनतील असा इशारा बराक ओबामा यांनी दिला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करतानाच महिला, लहान मुले, वृद्ध लोकांना कुठल्याहीप्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचा सल्लाही ओबामा यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना दिला आहे. तसेच त्यांना दहशतवादाविरोधात पाठिंबाही जाहीर केला.

फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष तेल अविव्हमध्ये
फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी तेल अवीव्हमध्ये पोहोचले. हमासच्या ताब्यात असलेल्या नागरिकांना सोडवण्याच्या दृष्टीने इम्यॅन्युएल यांनी इस्रायलच्या उच्चाधिकाऱयांशी चर्चा केली. अपहण करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये फ्रान्ससह अमेरिका आणि इतर देशांच्या नागरिकांचाही समावेश आहे.

23 लाख लोकांचे प्रचंड हाल
गाझापट्टीत सध्या 23 लाख लोकांचे प्रचंड हाल सुरु असून अन्न, पाणी आणि औषधांचा अपुरा पुरवठा यामुळे मृतदेहांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी मदतीची तिसरी खेप इजिप्तच्या राफाह सीमेद्वारे गाझामध्ये पोहोचवण्यात आली. दरम्यान, इस्रायलमध्ये अद्यापही इंधनाचा प्रचंड तुटवडा असून जनरेटर्सही किती काळ चालतीत याची शाश्वती नाही. मुदतीआधीच जन्माला आलेल्या अनेक अर्भकांना इन्क्युबेटर्समध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.