कोरोनाविरोधातील लढाईत आता ‘इस्रोचा श्वास’;स्वदेशी बनावटीचा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या संकटात जाणवणारी ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ऑक्सिजन एक्प्रेसपासून ते नवीन ऑक्सिजन प्लाण्ट उभारून रुग्णांसाठी आवश्यक प्राणवायूची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इस्रोनेदेखील आता स्वदेशी बनावटीचे ‘श्वास’ नावाचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तयार करून कोरोनाविरोधातल्या लढाईत मोठे योगदान दिले आहे.

कोरोनाच्या लढाईत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने यादरम्यानच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तयार केला आहे. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरला ‘श्वास’ असे नाव देण्यात आले आहे. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून रुग्णांना 95 टक्क्यांहून अधिक गुणवत्तापूर्ण प्राणवायू मिळेल असा दावा ‘इस्रो’च्या वतीने करण्यात आला आहे.

मेडिकल उपकरणे तयार करणे हे काम ‘इस्रो’अंतर्गत येत नाही. अशा प्रकारची उपकरणे तयार करण्यासाठी ह्युमन सायकोलॉजीचे सखोल ज्ञान आवश्यक असते. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची निर्मिती करून फक्त रॉकेट सायन्समध्ये या विभागाचे विशेष नैपुण्य मर्यादित नाही. तर देश संकटात असताना ही संस्था गरजेनुसार सर्वच क्षेत्रांत काम करण्यास सक्षम असल्याचे ‘श्वास’ या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची निर्मिती करून ‘इस्रो’ने सिद्ध केले आहे.

याआधीही ‘इस्रो’च्या वतीने इन हाऊस मेडिकल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मोठय़ा टँक्सच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. ‘इस्रो’च्या वतीने तयार करण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हा 600 वॉट पॉवर क्षमतेचा आहे. तसेच 220 वोल्ट 50 हर्ट्झच्या व्होल्टेजवर हे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर काम करतात. यामध्ये ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रशन हे 82 टक्के ते 95 टक्के इतके असेल. यामध्ये फ्लो रेट, लो फ्लो रेट आणि हाय फ्लो रेटसाठी ऑडिबल अलार्म बसवण्यात आले आहेत. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वजन 44 किलो इतके आहे.

‘श्वास’ या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून प्रेशन स्विंग अॅबसॉर्बशनद्वारे हवेतून नायट्रोजन गॅस वेगळा केला जातो आणि तो ऑक्सिजन रुग्णांना प्रदान केला जातो.

‘इस्रो’चे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर एका मिनिटात जवळपास 10 लिटर ऑक्सिजन देण्यासाठी सक्षम आहे. तसेच या माध्यमातून एकाच वेळी दोन रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात.