हवाई दलाचे विमान अरुणाचलमधून बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इटानगर

हिंदुस्थानी हवाई दलाचे ‘एएन-32’ विमान सोमवारी दुपारी आसामच्या जोरहाट हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या मेचुका एअरफिल्डवरून अचानक बेपत्ता झाले. चीनच्या सीमेजवळच हे क्षेत्र असल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आठ कर्मचाऱयांसह इतर 13 जण या विमानात होते. जोरहाट येथून दुपारी 12.25 वाजता उड्डाण केल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंतच हे विमान संपर्कात होते. त्यानंतर अचानक संपर्क तुटला. हवाई दलाने बेपत्ता विमानाच्या शोधासाठी सुखोई-30 आणि सी-130 या विशेष विमानांनी मोहीम हाती घेतली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या उपप्रमुखांशी चर्चा करून शोधमोहिमेबाबत माहिती घेतली. त्याबद्दल त्यांनी ट्विटरवरही लिहिले. ‘काही तासांपूर्वी बेपत्ता झालेल्या एएन-32 विमानाबाबत हवाई दलाचे उपप्रमुख राकेशसिंह भदौरिया यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी शोधमोहिमेबाबत माहिती दिली. विमानातील सर्वांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो.’

एएन-32 ही रशियन बनावटीची विमाने असून हवाई दलात त्यांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. 1980 पासून ती हवाई दलात आहेत. हे दोन इंजिन असलेले टर्बोप्रॉप वाहतूक विमान आहे. यापूर्वी जुलै 2016 मध्ये चेन्नईच्या पोर्टब्लेअर येथे जाणारे एएन-32 विमान कोसळल्याने 29 जण मृत्युमुखी पडले होते.