
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावच्या हद्दीत तांबडेमळा रस्त्यावर मागील आठ दिवसात दोन वेळा शालेय विद्यार्थ्यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी स्प्रे मारल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. मंचर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत विद्यार्थी व पालकांना धीर देत कोणी संशयस्पद व्यक्ती आढळल्यास मंचर पोलीस ठाण्याची संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
अवसरी येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत या घटना घडल्या आहेत. शनिवारी ( दि. 7 ऑक्टोंबर रोजी) 11 वर्षांच्या पाचवीतील मुलगा शाळेत जात असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी मुलाच्या हातावर स्प्रे मारला आणि ते निघून गेले होते. तर बुधवारी ( दि.11 ऑक्टोंबर रोजी) एका 14 वर्षांच्या आठवीतील एक विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीबरोबर शाळेत जात होती. त्यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या चार जणांपैकी एका व्यक्तीने तिच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यावेळी तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केला. त्यामुळे ते दुचाकीस्वार पळून गेले. हा स्प्रे मारल्यानंतर शरीराला खाज येऊन सूज येण्याचे प्रकार घडत असल्याचे विद्यार्थ्यांचे पालक सांगत आहेत.
दुचाकीवर येणारे कोण आहेत, ते कोठून येत आहेत, याबाबत कोणलीही खात्रीलायक माहिती मिळालेली आली नाही. मात्र, आठ दिवसात दोन वेळा घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य डी.डी.जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात माहिती दिली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नंदकुमार आढारी, शेखर भुइर, अविनाश दळवी यांनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थी, पालक, शिक्षक, यांच्याशी चर्चा करत पाहणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या अंगावर स्प्रे मारणाऱ्या व्यक्तींचा उद्देश समजला नसून अवसरी येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र शाळेत यावे. शक्यतो पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे, रस्त्याला, घराच्या आजूबाजूला कोणतीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास पालकांना, पोलीस पाटील, मंचर पोलीस यांना कळवावे. शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, शक्य असल्यास पुढील काही दिवस पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे, असे आवाहन मंचर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमशेखर शेटे यांनी केले आहे.

























































