जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकणार नाही, मी राजीनामा देणार!

कमी कालावधीत जागतिक राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱया न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. ‘देशाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकणार नाही असे मला वाटते, आता ती वेळ आली आहे’, अशा भावना व्यक्त करत जेसिंडा अर्डर्न यांनी अवघ्या 42 व्या वर्षी सर्वोच्च पद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच आगामी निवडणूक न लढविण्याचेही जाहीर केले आहे.

न्युझीलंडमध्ये ऑक्टोबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी लेबर पक्षाची आज बैठक झाली. त्यावेळी जेसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा पुढील महिन्यात देणार असल्याची घोषणा केली. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न म्हणाल्या, ‘राजकीय नेते हादेखील माणुसच आहे. जोपर्यंत पदावर आहे तोवर सक्षमपणे जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. ती जबाबदारी मी पार पाडली. पण आता ती वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विचार केला की देशाचे नेतृत्व करण्याची शक्ती माझ्याकडे आहे का? मला याचे उत्तर नाही असे मिळाले. खरा नेता तोच असतो ज्याला पद सोडण्याची योग्य वेळ माहिती असते. मात्र, याचा अर्थ मी कमकुवत मुळीच नाही.’