… तर भाजपला सशर्त पाठिंबा दिला असता! – जगन मोहन रेड्डी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी रविवारी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. भेटीनंतर बोलताना रेड्डी म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 250 जागांपर्यंत अडखळली असतील तर परिस्थिती वेगळी असती. त्यावेळी आम्ही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या लिखित शर्तीवर त्यांना समर्थन दिले असते. आता भाजपकडे पूर्ण बहुमत आहे, तरीही आम्ही आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीचा पाठपुरावा करत राहील.’

रविवारी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांचे दिल्लीतील आंध्र प्रदेश भवनमध्ये जोरदार स्वागत झाले. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. रेड्डी यांच्यासोबत भेट झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत त्यांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत भेट झाली. या दरम्यान राज्याच्या विकासासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळामध्ये केंद्राकडून त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, असे ट्वीट मोदींनी केले आहे. मोदी यांनी रेड्डींना 30 मे रोजी पंतप्रधानपदाच्या शपथग्रहण कार्यक्रमासाठी आमंत्रित केले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान वायएसआर प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथग्रहण कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. जगन मोहन रेड्डी 30 मे रोजी शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच रेड्डी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेत चर्चा केली.

आंध्र प्रदेशमध्ये वाएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचा सुपडा साफ केला. रेड्डी यांच्या पक्षाने विधासभा निवडणुकीमध्ये 175 जागांसह 151 जागांवर विजय मिळवला. टीडीपी पक्षाला फक्त 23 जागा मिळाल्या. यासह लोकसभा निवडणुकीमध्येही वाएसआर काँग्रेसने राज्यात 25 पैकी 22 जागांवर निर्भेय यश मिळवले, तर टीडीपीची उडी फक्त 3 जागांपर्यंत पोहोचली.