
जालना शहरातील रुख्मिणी गार्डन जवळील उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला आणि सोनाराला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी सदल बाजाल पोलीस ठाण्यामध्ये सुरेश पंढरीनाथ मगरे (रा. रुख्मिणी गार्डनजवळ, जालना) यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी राजू शामराव सुरासे (रा. साईनगर, देऊळगांव राजा, जि. बुलडाणा) यास पोलिसांनी बुधवारी अटक केली. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक लोखंडी टामी जप्त करण्यात आले आहे.
ही पोलीस अधीक्षक रागसुधा व अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक पायघन, डि.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, जनगन्नाथ जाधव, सोमनाथ उबाळे, इर्शाद पटेल, धनाजी कावळे, मनोहर भुतेकर यांनी केली आहे.






























































