
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे परिसरातील खरिप पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या घासाचा मुसळधार पावसामुळे चिखल झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.
शनिवारी रात्री अचानकपणे पडलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कपाशी, ऊस, तूर ही पिके आडवे पडली आहेत. फळबागांचेही नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यावर व परिसरात झाडे उन्मळून पडली आहे. अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी सुखापुरी महसूल मंडळातील शेतकरी वर्गातून होत आहे.
वडीगोद्री-शहागड-गोंदी परिसराला पावसाने झोडपले
अंबड तालुक्यातील वडीगोद्री, शहागड, गोंदी परिसरात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील कपाशी, ऊस, बाजरी आदी पिके भूईसपाट झाली. तर फळबागांची फळगळ मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी घराचे पत्रेही उडून गेल्याने संसार उघड्यावर आले.




























































