
पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून मोटारसायकल नेणे जिवावर बेतले आहे. या घटनेत तिघे जण वाहून गेले होते. त्यापैकी दोघांना वाचवण्या यश आले असून एक जण बेपत्ता आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील बामणी गावात ही घटना घडली.
बामणी गावचे उपसरपंच राजेंद्र खालापुरे (वय -35), आसाराम खालापुरे, (वय – 55), ग्रामपंचायत सदस्याचे पती लखन कांबळे (वय – 32, रा. वालखेड) हे तिघे परतूरहून गावी येत होते. दिवसभर संततधार पावसामुळे बामणी गावाजवळील पुलावर नदीचे पाणी वाहू लागले. पुलावर पाणी असतानाही तिघांनी पूल पार करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान आसाराम यांचा पाय घसरला ते पाण्यात पडले. एकमेकांना वाचवताना तिघेही पुराच्या पाण्यात वाहू जावू लागले. गावकऱ्यांनी तात्काळ मदत केल्याने दोघांना वाचवण्यात यश आले, तर आसाराम खालापुरे आणि मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रूपा चित्रक, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत आसाराम खालापुरे यांचा शोध सुरू होता, मात्र त्यांचा पत्ता लागला नाही.






























































