संपत्तीच्या वादातून गरोदर महिलेची हत्या, चार महिलांसह दोन जणांना जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपत्तीच्या वादातून गरोदर महिलेचा खून करणाऱ्या सहा जणांना जालना येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. गंभीर म्हणजे या हत्येतील दोषींपैकी चार महिला आहेत. ही हत्या 2020मध्ये करण्यात आली होती.

हिना खान (35) असं या महिलेचं नाव आहे. ती जालनातील काजीपुरा परिसरात राहत होती. 2020मध्ये ती सहा महिन्यांची गर्भवती असताना तिचा पती सय्यद ताम्बोळी हिच्या घरात हे सहा जण जबरदस्ती घुसले. त्यांनी हिनावर सळ्यांनी हल्ला करत तिला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात हिनाचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात सय्यद हाही जखमी झाला.

या प्रकरणी निलोफर जफर खान (23), नसीमा जफर खान (55), अरबाज खान जफर खान (20), इस्माइल अहमद शाह (38), हलीमा बी (60) आणि शबाना शाह (30) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिना खान हिच्या पहिल्या नवऱ्याचे ते नातेवाईक आहेत. त्यांचा हिनासोबत संपत्तीवरून वाद सुरू होता. त्या वादातूनच हिनाची हत्या करण्यात आली.

या प्रकरणी जालना सत्र न्यायालयाने या सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी बुधवारी हा आदेश दिला असून दोषींना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.