
खरीप हंगामाला अतिवृष्टीचा फटका बसला. त्यातून कसेबसे सावरत बळीराजाने रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी केली. सुरूवातीला पीक लहान असताना रानडुकरांनी अनेक ठिकाणी पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी केली. त्यातून बचावलेल्या पिकांवर आता मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मावा रोगामुळे पिकातून कणिसच बाहेर पडलेले नाहीत. जी कणसे बाहेर पडली, त्यांना दाणेच भरले नाहीत. यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.
जामखेड तालुक्यातील घाटमाथ्यावर साकत, सावरगाव, मोहा, जातेगाव, दिघोळ, खर्डा, अरणगाव, नान्नज, जवळा, हळगाव या परिसरात ज्वारी पिकांवर मोठ्या प्रमाणावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या परिसरात ज्वारी पिकांची काढणी सुरू आहे. कडबा एकदमच काळा कुट्ट पडला आहे. जी कणसे आहेत, त्यांना दाणेच भरलेले नाहीत. यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. खरीप हंगामात शेवटी अतिवृष्टीने फटका दिला. यामुळे पावसात पीक भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतीवृष्टीने ज्वारीची पेरणीही उशिरा झाली. सुरुवातीला चांगले पीके दिसत होते. त्या पिकांचे रानडुकरांनी मोठे नुकसान केले. त्यातून शेतकरी सावरत आसतानाच ज्वारी पिकावर मावाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे संपूर्ण पीक काळे पडले पिकातून कणीसच बाहेर पडले नाही. जी काही कणसे बाहेर आले त्यालाही नीट दाणा भरला नाही. यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. अतिवृष्टी, रानडुकरे, मावाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.





























































