
प्लॉट घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये व पतीच्या संबंधाबाबत विचारल्याच्या कारणाने साकत येथील विवाहितेचा छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे जामखेड पोलीस स्टेशनला सासरकडील पती सह चार जणांविरोधात हुंडाबळी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती शिवप्रसाद चंद्रकांत पाटील, सासू कंपनबाई चंद्रकांत पाटील, दीर उमेश चंद्रकांत पाटील व जाव राणी उमेश पाटील (सर्व रा. साकत ता. जामखेड) अशी चार आरोपींची नावे आहेत.
मयत महिलेचा भाऊ ज्ञानेश्वर हनुमंत चव्हाण (वय 28 वर्ष रा. सावरगाव ता.जामखेड) याने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादत म्हंटले आहे की, फिर्यादीची बहिण मयत रेषमा शिवप्रसाद पाटील ही तिच्या सासरी साकत येथे नांदत होती. दरम्यान वरील आरोपींनी दिनांक 4 एप्रिल 2021 रोजी सकाळी सातच्या सुमारास फिर्यादीची बहिण रेषमा हिला माहेरुन प्लॉट घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली. हे पैसे मिळत नाहीत व आपल्या पतीचा कोणत्या तरी बाईशी संबंधांबद्दल मयत रेषमा हिने विचारले असता वरील आरोपींनी तिला शिवीगाळ व मारहाण करून उपाशी ठेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसंच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, अशी फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केली.
या तक्रारीवरून चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मयत विवाहितेचा पती शिवप्रसाद चंद्रकांत पाटील यास पोलिसांनी अटक केली आहे.




























































