
जम्मू कश्मीरमध्ये एका होल्डिंग सेंटरमध्ये कोरोना चाचणी मोहीम राबवण्यात आली. त्यात 53 रोहिंग्या मुस्लिमांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले आहे. सोमवारी या होल्डिंग सेंटरमध्ये ही वैद्यकीय मोहीम राबवण्यात आली होती. सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीच लक्षणे नाही. सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जम्मू कश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात 53 रोहिंग्या मुस्लिम कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या डिटेंशन सेंटरमध्ये महिला, पुरुष आणि बालकांसह 220 रोहिंग्या राहत आहेत. त्यापैकी 58 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व रुग्ण निगराणीखाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
म्यानमारच्या रखाईन प्रांतात 2015 मध्ये लष्कर आणि रोहिंग्या मुस्लिमांमध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर लाखोंच्या संख्येने रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानम्यारमधून पलायन केले. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार बांगलादेशमध्ये 7 लाखांपेक्षा जास्त रोहिंग्या शरणार्थी अवैध प्रकारे राहत आहेत. तर हिंदुस्थानात 40 हजार रोहिंग्या आहेत.
























































