ब्रेकिंग न्यूज : जम्मू-कश्मीर विधानसभा बरखास्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी विधानसभा बरखास्त केली. संविधानाच्या कलम 53 नुसार जम्मू कश्मीरची विधानसभा बरखास्त केल्याची माहिती राजभवनकडून देण्यात आली आहे. विधानसभा बरखास्त करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपालांना पत्र लिहून आपल्याला काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरसचा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यांना एकूण 56 आमदारांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मुफ्ती यांनी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर 15 मिनिटानंतर पिपल्स कॉन्फरसनेही भाजपचा आपल्याला पाठिंबा असून सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

माजी मुख्यमंत्री मुफ्ती यांचा दावा

मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यापालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पीडीपी हा राज्यातील मोठा पक्ष आहे. आमच्याकडे 29 आमदार आहेत. माध्यमांतून आपल्याला माहिती मिळाली असेल की सरकार स्थापनेसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा आम्हाला पाठिंबा आहे. नॅशनल कॉन्फ्रन्सचे 15 आणि काँग्रेसचे 12 आमदार आहेत. सर्व मिळून आमची संख्या 56 होते. मी श्रीनगरमध्ये आहे परंतु आपली भेट घेणे मला सध्या शक्य नाही. हे पत्र देऊन मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही सरकार स्थापनेच्या दावा करण्यासाठी आपणाला लवकरात लवकर भेटण्याची इच्छा आहे.”

 सज्जाद यांचा दावा

नॅशनल कॉन्फ्रेसचे अध्यक्ष सज्जाद यांनी राज्यपालांच्या खाजगी सचिव जीवन लाल यांना व्हॉट्सऍपवर पाठवलेल्या पत्राचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. व भाजपचा आम्हला पाठिंबा असून इतर 18 आमदारांचाही आम्हाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही संख्या बहुमतापेक्षा अधिक असून भाजप आणि इतर सदस्यांच्या समर्थनाचे पत्र तुम्हाला पाठवत आहे. तसेच राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन करू असेही त्यांनी नमूद केले आहे.