सिल्व्हर ओकवरील हल्ल्याला फूस कोणाची हे स्पष्ट झाले, जयंत पाटील यांनी साधला निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी संपाच्या काळात ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावर हल्ला करणाऱया एसटी कर्मचाऱयांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. याचाच अर्थ ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला करण्यासाठी ‘त्या’ कर्मचाऱयांना कोणी फूस लावली होती हे लक्षात येते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर दगडफेक करणाऱया एसटी कर्मचाऱयांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला कुणी करायला लावला होता हे त्या कर्मचाऱयांना परत कामावर घेतल्याने स्पष्ट झाले, असे जयंत पाटील म्हणाले.

वैभव नाईकांवर दबाव

शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश ईडी सरकारने एसीबीला दिले आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, आमदार वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. ते निष्ठावंत आहेत. कदाचित त्यांनी शिवसेनेची साथ सोडावी यासाठी दबाव आणला जात आहे.

ते वक्तव्य हिंदू संस्कृतीत बसत नाही

आई-बापाला शिव्या घाला, पण मोदी-शहांना काही बोलाल तर सहन करणार नाही, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे याकडे जयंत पाटील यांचे लक्ष वेधले असता, आई-वडिलांना शिव्या देणे अत्यंत चुकीचे आहे. मराठी माणसे असे कधीही करत नाही. चंद्रकांत पाटील यांनी आई-वडिलांना शिव्या द्या असे सांगणे हे योग्य आहे असे मला वाटत नाही. मोदी-शहांची तुलना आई-वडिलांशी करणे हे तर अत्यंत चुकीचे आहे. हे हिंदू संस्कृतीमध्ये बसत नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.