मी परत येईन म्हणाले होते पण कुठे बसणार हे नाही सांगितलं, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पदी निवड झाली. निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानसभेतील सत्ताधारी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

”फडणवीसांनी अनेक वर्ष विधानसभेत काम केलं आहे. त्यांनी कायम मुद्देसूद भाषण केलं. वॉर्ड अध्यक्षपदापासून त्यांची कारकिर्द सुरू झाली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी प्रमुख म्हणून देखील काम केलं. त्या कामकाजाचा त्यांना गेल्या पाच वर्षात खूप फायदा झाला. प्रत्येक जण काम करतो पण एवढी प्रसिद्धी केली नाही”, असा अप्रत्यक्ष टोला देखील जयंत पाटलांनी फडणवीसांना लगावला आहे.

या भाषणावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी परत येईन’ या प्रचारात वापरलेल्या व गाजलेल्या वाक्याचा चांगलाच समाचार घेतला. ”मी आमच्या मतदार संघात भाषण करताना म्हणायचो की मी निवडून आल्यानंतर सदनात पहिल्या रांगेत बसेन. कोणत्या बाजूला बसेन ते माहित नाही पण पहिल्या रांगेत नक्की बसेन. मात्र त्यांच्या भाषणात ते म्हणाले मी परत येईन, सदनात कविता देखील मांडत त्यांनी मी परत येईन असे सांगितले. पण त्यांनी मी कुठे बसेन हे सांगितलं नव्हतं त्यामुळे ते आता परत आले आहेत ते विरोधी पक्ष नेते म्हणून,” अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला.