नामधारी मंत्रीपद आम्हाला नकोच!

सामना ऑनलाईन । पाटणा

भाजपने देऊ केलेले प्रातिनिधिक मंत्रीपद हवेच कशाला? असे नामधारी मंत्रीपद आम्हाला नकोच, या भूमिकेचा जदयू नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुनरुच्चार केला आहे. अर्थात बिहारमधील भाजप युतीवर याचा बिलकूल परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे बिहारबाहेर एनडीएसोबत आम्ही नाही, असेही त्यांनी जाहीर केले.

केंद्रात भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. सत्तास्थापनेसाठी भाजप एनडीएतील घटक पक्षांवर अवलंबून नव्हता. म्हणूनच त्यांनी एनडीएतील घटक पक्षांना प्रातिनिधिक मंत्रीपदाची ऑफर दिली. आम्हाला असल्या प्रातिनिधिक मंत्रीपदाची गरज वाटली नाही म्हणूनच आम्ही भाजपची ऑफर नाकारली, असे नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. मंत्रीपद नाकारले म्हणजे भाजपशी आमचे वाद आहेत असा अर्थ कुणी काढू नये असे सांगून नितीशकुमार म्हणाले, केंद्रात एक किंवा दोन मंत्री नसले म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही. आमची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. बिहारच्या भल्यासाठीच आम्ही एनडीएत परतलो आहोत, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

चार राज्यांत जदयु स्वबळावर
बिहारमध्ये भाजपशी युती असली तरी बिहारबाहेर सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय जदयू कार्यकारिणीने घेतला आहे. झारखंड, दिल्ली, हरयाणा आणि जम्मू-कश्मीर या राज्यांतील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे जदयूने जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या