
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) जेईई-मेन परीक्षेच्या तिसऱया सत्राचे वेळापत्रक मंगळवारी बदलले. त्या सुधारित वेळापत्रकात तिसऱया सत्रातील परीक्षा 20 ते 27 जुलैपर्यंत घेतल्या जाणार आहेत. मात्र 27 जुलैपासूनच चौथे सत्रही सुरू होत असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. चौथ्या सत्राच्या परीक्षेच्या तारखा बदलण्यात येतील अशी त्यांना अपेक्षा होती; परंतु तांत्रिक कारणाने आता त्यात बदल करता येणार नाही असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे.
जेईई मेन परीक्षेचे तिसरे सत्र 20, 22, 25 आणि 27 जुलै रोजी होणार आहे. यापूर्वीचे पेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते 25 जुलैपर्यंतच होणार होते; परंतु वेळापत्रकातील सुधारणेनंतर आता ते 27 जुलैपर्यंत गेले आहे. 27 जुलैलाच परीक्षेचे चौथे सत्रही सुरू होत आहे. चौथ्या सत्रातील परीक्षा 2 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत.
एनटीएने तिसऱया सत्राच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. तिसऱया सत्रासाठी 7 लाख 9 हजार 519 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याच कारणास्तव आता तिसऱया सत्राच्या तारखेत बदल करता येणार नाही असे एनटीएचे म्हणणे आहे.
‘क्लॅट’ परीक्षेशीही होतेय ‘क्लॅश’
जेईई मेनच्या तिसऱया सत्रातील परीक्षेची 23 जुलै ही तारीख ‘क्लॅट’ परीक्षेबरोबरही ‘क्लॅश’ होत आहे. विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही सामाईक विधी प्रवेश परीक्षा (क्लॅट) घेतली जाते. ही परीक्षा देणारे विद्यार्थी जेईई-मेन परीक्षेलाही बसले आहेत. एकाच दिवशी दोन परीक्षा देता येणार नसल्याने जेईईची तारीख बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

























































