झारखंडमध्ये 12 जणांनी केला तरुणीवर सामूहिक बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात दिवसाढवळ्या एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर 12 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाराही नराधमांना अटक केली आहे. पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

ranchi-rape

25 वर्षीय पीडित तरुणी ही लॉची विद्यार्थीनी असून मंगळवारी कॉलेजला जाण्यासाठी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. तिची मैत्रीण देखील तिच्यासोबत होती. त्यावेळी बाईकवरून आलेल्या दोघांनी बंदुकीचा धाक दाखवत तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी तिला शहरापासून दूर असलेल्या एका वीटभट्टीवर नेऊन तेथे 12 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्यांनी तिला याबाबत कुणास सांगितले तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करू असे सांगितले.

बलात्कारानंतर जखमी अवस्थेत पीडित तरुणीने काही स्थानिक महिलांच्या मदतीने कानके पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला रुग्णालयात दाखल केले आहे. या तरुणीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची एक विशेष टीम नेमण्यात आली होती. या पथकाने जलद तपास करत त्या बाराही नराधमांना अटक केली.