
राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांपैकी तीनशे शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी राज्य सरकारने आखला आहे. या शाळांमध्ये केवळ कित्ते गिरवण्यापेक्षा पाठय़पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना आधुनिक जगातील ज्ञानाची दालने खुली केली जातील. या शाळांमध्ये पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवण्यावर भर राहील. मुख्य म्हणजे, विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून मुक्तता देण्यासाठी प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळेचा प्रयोग राबवण्यात येणार आहे
राज्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या तीनशे शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याची घोषणा मार्चमधील विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. या घोषणेची आता पूर्तता होणार आहे. या योजनेत राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातून जिल्हा परिषदेची एक शाळा निवडली जाईल.
पहिल्या टप्प्यात तीनशे शाळांची निवड होईल. निवडलेल्या आदर्श शाळा इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंतच्या शाळा असतील आणि गरज पडल्यास इयत्ता आठवीचे वर्ग जोडले जातील.
आदर्श शाळा म्हणजे काय…
आदर्श शाळा निर्माण करताना त्यामध्ये भौतिक सुविधा म्हणजे स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारती, क्रीडांगण अत्याधुनिक लॅब, सुसज्ज ग्रंथालयांचा समावेश असेल. त्याशिवाय शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण निर्माण केले जाईल. वर्गात उभे राहून वाचनावर भर दिला जाईल. ग्रंथालयात पूरक वाचनाची पुस्तके, संदर्भ ग्रंथ, एनसायक्लोपीडिया उपलब्ध करून दिले जाईल.
विद्यार्थ्यांना आठवडय़ातून किमान एक दिवस तरी दप्तराच्या ओझ्यापासून मुक्तता मिळण्यासाठी प्रत्येत शनिवारी दप्तरमुक्त शाळेचे उपक्रम या आदर्श शाळांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्याची योजना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राबवली आहे.
- आदर्श शाळेतील आदर्श वातावरण पाहून इतर शाळा सोडून या शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश देण्यासाठी पालक आपृष्ट होतील. अशा पद्धतीने शाळांध्ये शिक्षण दिले जाईल. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांना शनिवार व रविवारही शाळेत यावेसे वाटले पाहिजे अशा प्रकारे शाळेत प्रसन्न वातावरण निर्मितीवर भर दिला जाईल.


























































