काँग्रेससाठी ‘थोडी खूशी ज्यादा गम’, ‘या’ प्रवक्त्याचा दारूण पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

randeep-surjewala

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये कमबॅक करण्यासाठी काँग्रेस कंबर कसून तयारीला लागली आहे. मात्र या आधीच आज झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना निर्भेळ यश मिळवता आलेले नाही. विशेषत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे खासमखास म्हणून ओळखले जाणारे आणि पक्षाचे प्रवक्ते पद सांभाळणारे रणदीप सुरजेवाला यांचा या पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे राजस्थानमधील लोकसभेची जागा मोठ्या फरकाने जिंकून देखील काँग्रेसला फारसा जल्लोश करता येणार नसल्याने ‘थोडी खूशी, ज्यादा गम’ असंच चित्र दिसत आहे.

काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची बाजू मांडणारे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचे नाव देशातील जनतेला माहीत आहे. ते राहुल गांधी यांच्या मर्जीतले असल्याची चर्चा देखील होते. ते आक्रमकतेने मोदी सरकारवर टीका करतानाही दिसतात. मात्र अशा सर्व जमेच्या बाजू असताना देखील जींद येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ते केवळ पराभूत होणार असे नाही तर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर जननायक जनता दल या स्थानिक पक्षाचे दिग्विजय चौटाला पहिल्या क्रमांकावर, भाजपचे डॉ. कृष्ण मिढा हे दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसचे सुरजेवाला हे तिसऱ्या क्रमांकावर होते. सहाव्या फेरीनंतर भाजपच्या मिढा यांनी आघाडी घेतली. त्यानंतर देखील मिढा आणि चौटाला यांच्यातील मतांचे अंतर 9408 इतके झाले. सुरजेवाला मात्र तिसऱ्या क्रमांकावर कायम होते. त्यामुळे काँग्रेससाठी पराभव निश्चित मानला जात होता.

हरयाणाच्या जींदमध्ये काँग्रेसने आपले प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना मैदानात उतरवून ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली. मात्र असे असतानाही सुरजेवाला हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.