‘आता आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन…’, NCERT च्या ‘त्या’ निर्णयावर आव्हाडांची फटकेबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) नववी आणि दहावीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत बाद करत पाठ्यपुस्तकातून हे प्रकरण वगळले आहे. याविरोधात देशातील 1800हून अधिक शास्त्रज्ञ, शिक्षक, विज्ञानप्रेमी एकवटले असून त्यांनी एनसीईआरटीला खुले पत्रच लिहिले आहे. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह आता विरोधी पक्षानेही हा मुद्दा उचलून धरत सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत खोचक शब्दांमध्ये सरकारवर टीका केली.

आनुवंशिकता आणि उत्क्रांती’ या प्रकरणात चार्ल्स डार्विन, पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती, आण्विक फायलोजेनी, उत्क्रांती, उत्क्रांती आणि वर्गीकरण, उत्क्रांती संबंधांचा मागोवा घेणे, टप्प्यांनुसार उत्क्रांती आणि मानवी उत्क्रांती या विषयांचा समावेश होता. कोरोनाच्या साथीनंतर विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्याच्या नावाखाली नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) नववी आणि दहावीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांतच बाद केला आहे. याविरोधात शास्त्रज्ञ, शिक्षक, विज्ञानप्रेमींनीही आवाज उठवला असून विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत काढून टाकणे म्हणजे शिक्षणाची एकप्रकारे फसवणूकच असल्याचे म्हटले आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनीही यावर ट्विट केले आहे.

चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. त्याचे कारण देताना मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही असे काहीसे शब्द त्यामध्ये दिसतात. जे झाले ते दैविक होतं. याकडे वैज्ञानिक बुद्धीने बघू नका. म्हणजे बुद्धीप्रामाण्य वाद हा आता संपल्यात जमा. म्हणजे आंबा खाऊन मुलं होतात आणि सफरचंद खाऊन पहिला माणूस जन्माला आला हे सिद्धांत आता यापुढे आपल्याला मान्य करावे लागतील, अशा शब्दात आव्हाड यांनी टीका केली.

हा बदल आम्हाला मान्य नाही असे पत्रक देश भरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे. विरोध केला जातोय हे कौतूकास्पद आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.