नोकरी गेल्याने करू लागला फसवणूक, वृद्ध महिलेच्या शेअरची केली हेराफेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृद्ध महिलेचे 3 कोटी रुपयांचे शेअर दुसऱ्या खात्यात वळवून फसवणूक करणाऱ्या ठगाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. नरेश सिंग असे त्याचे नाव आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने घर चालवणे कठीण झाल्यामुळे पैशासाठी नरेशने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.

तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या बोरिवली परिसरात राहतात. त्यांच्याकडे 43 विविध कंपनीचे शेअर असून त्यांनी एका ब्रोकिंग एजन्सीच्या माध्यमातून ते शेअर विकत घेतले होते. एप्रिल महिन्यात तक्रारदार यांना एक पत्र आले. त्यात त्यांच्या नावात बदल करण्यात आला होता. तक्रारदार यांनी नावात बदल करण्यासाठी कोणताही अर्ज केला नव्हता. तरीदेखील त्यांच्या नावात बदल आणि राहण्याचा पत्ता बदलला होता. हा प्रकार समजताच तक्रारदार यांनी एका ब्रोकिंग एजन्सीला संपर्क साधला. अज्ञात ठगाने तक्रारदार यांचे डिमॅट खाते आणि राहण्याचा पत्ता बदलला होता. तक्रारदार यांची बनावट स्वाक्षरी करून 3 कोटी 14 लाख रुपयांच्या शेअरची परस्पर विक्री केली. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तक्रारदार यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक दिनेश चौहाण, रेवळनाथ गोसावी, विजय लहानगे यांनी तपास सुरू केला. फसवणूक केल्यानंतर नरेश हा एका बँकेत स्लिप आणण्यासाठी गेला होता. तेथील फुटेज पोलिसांना मिळाले. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. तसेच पोलिसांना काही नंबर मिळाले. त्या नंबरचे विश्लेषण केल्यानंतर नरेशची माहिती समोर आली. पोलिसांचे पथक चारकोप येथील ब्रोकिंग एजन्सीच्या कार्यालयात गेले. तेथे गेल्यावर पोलिसांना नरेशची माहिती मिळाली. नरेश हा दिल्लीला असल्याचे समजताच चौहाण यांचे पथक तेथे गेले. त्याला दिल्लीहून अटक करून मुंबईत आणले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत व्यक्तीच्या नावावर काढले बँक खाते

फसवणूक केल्यावर महिलेचे पैसे दुसऱ्या खात्यात वळवण्यासाठी नरेशने बनावट कागदपत्रे बँकेला सादर करून खाते उघडले. ती कागदपत्रे 2017 मध्ये मृत असलेल्या व्यक्तीची होती अशी माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी पत्रव्यवहार करून खात्यात जमा झालेली रक्कम फ्रिज केली.