बँक खाती विकणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायबर ठगांना बँक खाती पुरवणाऱ्या दोघांना जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. प्रवीण कुमार सरोज आणि रोहित कुमार अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांनी अनेक बँक खाती उघडल्याचे तपासात समोर आले आहे.

जोगेश्वरी येथे महिला राहते. तिला पैशांची गरज होती. फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्रामवर तिला एक लिंक दिसली. ती लिंक उघडल्यानंतर एक ‘ई-वॉलेट’ अॅप उघडले गेले. त्या अॅपमध्ये महिलेने तिची आणि बँक खात्याची माहिती अपलोड केली. ठगाने महिलेला लोनचे प्रलोभन दाखवले. प्रोसेस फी, नोंदणी अशी विविध कारणं सांगून ठगांनी महिलेकडून 98 हजार रुपये उकळले. कर्जाची गरज असल्याने महिलेने ते पैसे दिले. पैसे दिल्यानंतर महिलेने लोनबाबत विचारणा केली. तेव्हा ते टाळाटाळ करू लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सतीश तावरे याच्या पथकातील पोलीस निरीक्षक सपकाळ यांच्या पथकातील उपनिरीक्षक सुनीता भोसले, कदम, बांदेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. ज्या खात्यात पैसे गेले, त्याची माहिती पोलिसांनी काढली. त्यानंतर पोलीस बँकेत गेले. बँकेत गेल्यावर तेथेदेखील अधिकाऱयाने पोलिसांना सहकार्य केले नाही. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांचे पथक पालघर येथे गेले. तेथून पोलिसांनी प्रवीण कुमारला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत रोहित कुमारचे नाव आले. रोहित कुमारच्या अटकेसाठी पोलिसांनी सापळा रचला. अखेर पोलिसांनी रोहित कुमारला अटक केली. रोहित कुमार आणि प्रवीण कुमार हे दोघे मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत. ते दोघे पालघर येथे मजुरीचे काम करतात. झटपट पैशांसाठी ते दोघे गरजूंना पैसे देऊन त्यांची बनावट खाती उघडतात. त्याच्या मोबदल्यात त्या दोघांना काही रक्कम मिळते. बँकेचे एटीएम कार्ड आणि पासबुक ते दोघे एका फरार आरोपीला देतात. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.