
जोगेश्वरी येथे लांब पल्ल्याच्या ट्रेन सोडण्यासाठी टर्मिनस बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथे मेल-एक्सप्रेस सोडण्यासाठी दोन प्लॅटफॉर्म बांधून पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी दिली आहे. या टर्मिनसवरून कोणत्या गाडय़ा सोडायच्या यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याचा निर्णय होताच येथून लांब पल्ल्यांच्या ट्रेन सोडण्यात येणार आहेत.
मुंबई शहराची लाइफलाईन असलेल्या लोकलचा प्रवास पिकअवरमध्ये जलद होण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ांना शहरात न आणता उपनगरातच त्यांचा प्रवास समाप्त करण्याचे नियोजन आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसचा भार कमी करण्यासाठी जोगेश्वरी येथे नवीन लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 69 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रेल्वे अर्थसंकल्पातही यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येथे दोन प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जी.व्ही.एल. सत्यकुमार यांनी दिली आहे. प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर उर्वरित बजेटमधून रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यासह अन्य तांत्रिक कामे केली जात आहेत. लवकरच रेल्वे बोर्डाकडून गाडय़ांची छाननी होताच येथून गाडय़ा सोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
































































