मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील रिकामी, खुर्च्या दाखवणाऱ्या पत्रकारांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीव-चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात आयोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या दाखवणाऱया पत्रकारांना गुंडांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

सोमय्या मैदानात मुंबई महानगरपालिकेचा महिला व बाल कल्याण विकासाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात श्रोत्यांपेक्षा रिकाम्या खुर्च्याच अधिक होत्या. मुख्यमंत्री भाषण करत होते आणि शेकडो खुर्च्या रिकामीच होत्या. त्या रिकामी खुर्च्यांचे व्हिडीओ बनवून वास्तव दाखवण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. त्यामुळे संबंधित पत्रकारांना गुंडांकडून मारहाण केली गेली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या…कारवाई करा!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात ट्विट करून सदरहू घटनेचा निषेध केला आहे. ‘राज्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱया कार्यक्रमात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱया पत्रकारांना मारहाण केली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे’, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे. ‘पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी याची तातडीने दखल घेऊन याबाबत कारवाई करण्याची गरज आहे. राजकीय व्यक्तींनीदेखील अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांनीदेखील कार्यकर्त्यांना आवर घालणे आवश्यक आहे,’ अशी मागणीही त्यांनी ट्विटमध्ये केली आहे.