राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या न्यायमूर्तींची बदली

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांची दोन वर्षांच्या दोषसिद्धी आणि शिक्षेला स्थगितील दिली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने सोमवारी अधिसूचना जारी करून राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व बहाल केले होते. राहुल गांधींना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणारे गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत एम प्रच्छक यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने बदली केली आहे . त्यांच्याव्यतिरिक्त गुजरात उच्च न्यायालयातील अन्य तीन न्यायमूर्तींचीही बदली करण्यात आली आहे. प्रच्छक यांची पाटणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

मोदी आडनाव प्रकरणी सुरत येथील स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत येथील सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही दिलासा न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती प्रच्छक यांच्यासमोर राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भातील याचिका सुनावणीसाठी आली होती. ही याचिका त्यांनी फेटाळून लावली होती. न्यायमूर्ती प्रच्छक यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना झालेली शिक्षा आणि दोषसिद्धी या दोन्हीला स्थगिती दिली होती. ही स्थगिती मिळाल्याने राहुल गांधी यांची खासदारकी बहाल होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यानंतर लोकसभा सचिवालयाने सोमवारी एक अधिसूचना जारी करून राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व बहाल केले. राहुल गांधींना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलेल्या सर्वाधिक शिक्षेवर आक्षेप घेतला होता.

गुजरातमधील पोरबंदर येथे जन्मलेले हेमंत प्रच्छक 18 ऑक्टोबर 2021 रोजी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनले . 2015 ते 2019 या काळात त्यांनी केंद्र सरकारचे स्थायी समुपदेशक म्हणून काम केले आहे . त्यानंतरच त्यांना बढती देऊन गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनवले गेले. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांच्या खटल्याची सुनावणी त्यांच्यापुढे झाली होती, ज्यामुळे ते प्रकाशझोतात आले होते. प्रच्छक यांच्याशिवाय न्यायमूर्ती अल्पेश कोगजे , न्यायमूर्ती कुमारी गीता गोपी आणि न्यायमूर्ती समीर जे दवे यांचीही बदली करण्यात आली आहे.