जुनिअर महिला हॉकी सपर्धा; अखेरच्या लढतीतील पराभवानंतरही हिंदुस्थानी महिलांना विजेतेपद

कॅनबेरा येथे खेळविण्यात आलेल्या तिरंगी जुनिअर महिला हॉकी स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढतीत यजमान ऑस्ट्रेलियन संघाकडून हिंदुस्थानी महिलांना 1-2 असा निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या उभय संघांचे 7-7 गुण झाले असतानाही सरस गोल फरकाच्या आधारे हिंदुस्थानला विजेतेपद बहाल करण्यात आले. या स्पर्धेतील 4-4 लढती जिंकून हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघांनी प्रत्येकी 7 गुण मिळवले होते. अंतिम साखळी लढतीत हिंदुस्थानी संघाच्या वतीने एकमेव गोल गगनदीप कौर हिने नोंदवला. हिंदुस्थानी जुनिअर महिला संघाने या तिरंगी स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत 3 लढती जिंकण्याचा पराक्रम केला.अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियन महिलांनी 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर गगनदीप कौरने ५३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत हिंदुस्थानला 1 – 1 अशी बरोबरी साधून दिली. मात्र हिंदुस्थानी संघाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 56व्या मिनिटाला एबीगेलने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत यजमान ऑस्ट्रेलियन संघाला 2 -1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरच्या काही मिनिटांत हिंदुस्थानी फॉरवर्ड्सनी बरोबरीसाठी जोरदार संघर्ष केला. पण यजमान संघाच्या बचावफळीने त्यांचे सारे प्रयत्न फोल ठरवले.

हिंदुस्थानी गोलरक्षकाचा स्तुत्य बचाव ऑस्ट्रेलियन फॉरवर्ड्सच्या जोरदार आक्रमणाला हिंदुस्थानी गोलरक्षक बिचू देवी खारिबाम हिने समर्थपणे थोपवले. तिने 28व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियन संघाला मिळालेला पेनल्टी स्ट्रोक अफलातूनपणे रोखत यजमानांना 2-0 अशी आघाडी मिळू दिली नाही. अन्यथा ऑस्ट्रेलियन संघाने मोठा विजय मिळवत गोल फरक अधिक सरस करीत जेतेपदही पटकावले असते. त्यामुळे बिचूदेवीचे गोलरक्षण संघाच्या जेतेपदासाठी महत्वपूर्ण ठरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या