
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील चार रिक्त न्यायमूर्तींच्या पदांपैकी दोन पदे भरण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजीयमने केली आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि हिमाचल प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती भूषण गवई हे मूळचे अमरावती येथील असून मुंबई उच्च न्यायालयात 1987 सालापासून स्वतंत्रपणे त्यांनी वकिलीला सुरुवात केली. 1990 नंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर स्वतंत्रपणे प्रॅक्टिसला सुरुवात केली. अमरावती, नागपूर महापालिकेच्या वतीने त्यांनी हायकोर्टात अनेकदा भक्कमपणे बाजू मांडली. त्याचबरोबर अमरावती विद्यापीठाकडूनही हायकोर्टात युक्तिवाद केला. ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 पर्यंत नागपूर खंडपीठासमोर अतिरिक्त सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून 14 नोव्हेंबर 2013 साली त्यांची निवड करण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.



























































