इतिहासाची पुनरावृत्ती, ज्योतिरादित्य सिधियांचे वडील व आजीनेही सोडली होती काँग्रेस

4559

मध्य प्रदेशमधील ताकदवर नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. सिंधिया यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे याची घोषणा केली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अन्य 19 आमदारांनीही राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. राजीनामा देण्यापूर्वी ज्योतिरादित्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट झाले आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा निर्णय म्हणजे गद्दारी; काँग्रेसचा आरोप

संपूर्ण देश होळीच्या रंगात बुडाला असताना मध्य प्रदेशमध्ये मात्र अनेकांच्या चेहऱ्यावरील रंग उतरला आहे. दिवंगत वडिलांच्या जयंतीच्या दिवशी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने अनेकांना 28 वर्षांपूर्वी माधवराव सिंधिया यांनी उचलले पाऊल आठवले. 1993 ला माधवराव सिंधिया यांनीही काँग्रेसचा हात सोडला होता आणि आज माधवराव सिंधिया यांच्या 75 व्या जयंतीला त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.

मुख्यमंत्री नाही, भाजपकडून सिंधियांना मिळणार ही संधी?

28 वर्षांपूर्वी काय झाले?
1993 मध्ये मध्य प्रदेशमध्ये दिग्विजय सिंह यांचे सरकार होते. त्यावेळी माधवराव सिंधिया यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेसला रामराम केला होता आमि मध्य प्रदेश विकास काँग्रेस नावाचा नवीन पक्ष स्थापन केला होता. मात्र काही काळानंतर ते काँग्रेसमध्ये परतही आले होते.

राजमाता विजयराजे सिंधियांनीही सोडला होता काँग्रेसचा हात
1967 मध्ये मध्य प्रदेशमध्ये डी.पी. मिश्रा यांचे सरकार होते. त्यावेळी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि अन्य कारणांमुळे नाराज झालेल्या राजमाता विजयराजे सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडून जनसंघामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसचे सरकार पडले आणि जनसंघाच्या समर्थनाच्या बळावर गोविंद नारायण सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. यानंतर जनसंघाच्या तिकिटावर राजमाता विजयराजे सिंधिया यांनी लोकसभा निवडणूक लढली आणि जिंकली.

इतिहासाची पुनरावृत्ती
सद्यस्थितीला ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही काँग्रेसचा हात सोडल्याने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी वडील माधवराव आणि आजी राजमाता विजयराजे यांच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेस पक्ष सोडला आहे.

विधानसभेनंतर कुरबुरी वाढल्या
मध्य प्रदेशमध्ये 2018 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रबळ दावेदार असतानाही ज्योतिरादित्य सिंधिया यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष बनण्यात रस असताना दिग्विजय सिंह यांनी मध्ये खोडा घातला आणि त्यांची ही देखील संधी गेली. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया नाराज होते. या वर्षीच्या सुरुवातीला त्यांनी भाजप नेत्यांशी संपर्क वाढवला आणि 21 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री, भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत एक तास चर्चाही केली. त्यानंतर कमलनाथ सरकारमधील नेत्यांनी भाजप आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या