के. के. रेंजमधून मिसफायर झालेल्या जिवंत बॉम्बची चोरी, एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

खारेकर्जुने येथील लष्कराच्या के. के. रेंज हद्दीतून मिसफायर झालेल्या बॉम्बची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमित संतोष गोंधळे व जयराम चौधरी (दोघे रा. ढवळपुरी, ता. पारनेर, जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. लष्करातील कर्मचारी बंडू उत्तम येणारे (वय 38, नेमणूक के. के. रेंज) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

खारेकर्जुने येथील के. के. रेंज प्रशिक्षण हद्दीमधून मिसफायर झालेला जिवंत बॉम्ब अमित गोंधळे व जयराम चौधरी यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी के. के. रेंज हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून चोरून नेला होता. घरातील शेताजवळ हा बॉम्ब त्यांनी जमिनीत पुरून ठेवला होता. 31 मार्च रोजी ही बाब उघडकीस आली. पारनेर पोलिसांनी तत्काळ लष्करी अधिकाऱयांना माहिती दिल्यानंतर लष्कराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस दलाचे बॉम्बशोधक पथक व लष्कराचे बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॉम्बची पाहणी केली असता हा बॉम्ब जिवंत असल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

लष्करी अधिकारी व पोलिसांनी सदरचा परिसर तत्काळ रिकामा केला. लष्कराच्या बॉम्बशोधक पथकाने त्या ठिकाणीच तो बॉम्ब नष्ट केला. आरोपींनी के. के. रेंज आर्मी प्रशिक्षण प्रतिबंधित क्षेत्रामध्ये घुसून हा बॉम्ब सुमारे तीन महिन्यांपूर्वी चोरून नेला व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने घराशेजारील शेतात पुरून ठेवलेला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.