कळंब – खासगी दवाखाने बंद ठेवल्यास परवाने रद्द करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोना व्हायरसच्या विळख्यात जनता तडफडत असताना कळंब शहरातील काही खासगी दवाखाने बंद करून डॉक्टरांनी पळ काढला होता. या प्रकारामुळे डॉक्टराबद्दल संतापाची लाट निर्माण झाली होती. दै. सामनामधे यासंबंधी वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिक चोवीस तास सेवा देण्याचे आदेश दिले असून दवाखाने बंद ठेवल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असे आदेश काढल्याने खासगी डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

कोरोना व्हायरसच्या विळख्यात जनता तडफडत असून केंद्र व राज्य शासन शर्थीचे प्रयत्न करत असून आणीबाणी सारखी परिस्थीती निर्माण झाली आहे. असे असताना धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून पळ काढला होता. या बाबत दै. सामनामध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती.

धाराशिवच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांनी आज महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र कोविड -19 नुसार अध्यादेश काढले. जिल्ह्यातील बऱ्याच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या रुग्णालयाची बाह्य रूग्ण सेवा बंद केली असल्याने त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. खासगी व्यवसायीकांनी रुग्णालयातील आवश्यकतेनुसार बाह्यरुग्ण सेवा चोवीस तास उपलब्ध करून देणे बंधनकारक असून सेवा न दिल्यास बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार करण्यात आलेली नोंदणी रद्द करण्यात येईल, असा अध्यादेश काढल्याने खासगी डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

डॉ. जाधवरांचे मानले अनेकांनी आभार
खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने कोरोनाच्या भीतीने बंद केले. परंतु या काळात ओम बालरूग्णालयाचे डॉ. रमेश जाधवर, डॉ. रूपेश कवडे व स्टाफने सर्वांना सेवा देत तपासणी केली व माणुसकीचे दर्शन घडवले. यामुळे सोशल मीडियावरही व व्यक्तिगत भेट घेऊन अनेकांनी त्यांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या