… तर रुग्णालयचं बंद करा; मेडिकल कॉलेजमधील तोडफोड प्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारले

कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येविरोधात आंदोलन सुरू होते. मात्र बुधवारी रात्री या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने पोलिसांचा बंदोबस्त तोडून रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये शिरून तोडफोड केली. याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी आता कोलकता उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे.

उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वकिलांनी बुधवारी घडलेली सगळी घटना सांगितली. सोबत त्यांनी पुरावा म्हणून घटनेचा व्हिडीओ देखील दाखवला. हत्येविरोधातील आंदोलनामुळे रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी रुग्णालयात अचानक 7000 आंदोलक शिरले होते. आम्हाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली, असे यावेळी सरकारी वकिलांनी सांगितले.

दरम्यान न्यायालयाने यावर महत्त्वाची टिप्पणी केली. अशीच परिस्थिती असेल तर रुग्णालय बंद करा आणि रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवा, मग हॉस्पिटलच बंद झाल्यावर असा गदारोळ होणार नाही. अशा भीतीच्या वातावरणात डॉक्टर कसे राहतील? त्यामुळे रुग्णालयच बंद करावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले.

दरम्यान, न्यायालयाने पोलिसांकडून या प्रकरणातील सगळे पुरावे मागितले आहेत. तसेच पीडितेचा फोटो प्रसारमाध्यमांमध्ये दाखवू नये किंवा सार्वजनिक करू नये, असेही आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.