
कोट्यवधी देशवासियांचा आणि स्वातंत्र्यसेनानी यांचा अपमान करणार्या अभिनेत्री कंगना राणावत हिचा केंद्रसरकारने पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले होते यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
1857 पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र हिंदुस्थान करण्याची घोषणा केली आणि 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. एवढं बलिदान असताना कंगना राणावत ही अभिनेत्री ओवरडोस झाल्यासारखी काहीही बोलते अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली.
काय म्हणाली कंगना?
नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचे डोके पुन्हा फिरले आहे. ‘देशाला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले आहे’, असे भयंकर विधान कंगनाने केले. कंगनाच्या या माथेफिरू वक्तव्यामुळे देशभरात आणि नेटकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. देशासाठी बलिदान करणाऱ्या हजारो स्वातंत्र्ययोद्धय़ांचा कंगनाने अपमान केला. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. ‘पद्मश्री’ पुरस्कार परत घ्या, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.


























































