कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने आज डम्पिंग ग्राऊंडच्या विस्ताराला विरोध करणारी मागणी फेटाळून लावत दोन महिन्यांपूर्वी घातलेली स्थगिती अखेर आज उठवली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पालिकेला दिलासा मिळाला असून डम्पिंग ग्राऊंडच्या जागेत आणखी 52 हेक्टर जमिनीची भर पडणार आहे.

सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडचा विस्तार करण्यात येत आहे. ठाणे खाडीलगत असलेल्या तिवरांच्या झाडांवर तसेच संवेदनशील क्षेत्र असलेल्या फ्लेमिंगोंच्या जागेवर त्याचा परिणाम होणार असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमी स्टॅलियन दयानंद यांच्या ‘वनशक्ती’ या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत मुख्य न्यायमूर्तींनी गेल्या सुनावणीवेळी सप्टेंबर महिन्यात डम्पिंग ग्राऊंडच्या विस्तारावर स्थगिती घातली होती. आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. देवनार डंपिंगची मुदत डिसेंबरअखेरपर्यंत आहे. त्यामुळे कांजूरमार्गवरील कचऱ्याचे विघटन करण्याच्या प्रकल्पावरील स्थगिती हटविण्याची मागणी महापालिकेच्या वतीने ऍड. अनिल साखरे यांनी केली. दररोज 6700 मेट्रिक टन कचरा गोळा होतो. यापैकी कांजूरमध्ये 5000 ते 5500 टन कचऱ्याचे विघटन केले जाते. त्यामुळे शहराच्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प सुरू करणे अत्यावश्यक आहे असा युक्तिवाद पालिकेच्या वतीने करण्यात आला. पालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी पडणारी अपुरी जागा तसेच येथील कचरा विघटन प्रकल्पावरील घालण्यात आलेल्या स्थगितीमुळे पालिकेची होणारी अडचण लक्षात घेऊन हायकोर्टाने आज ही स्थगिती उठवली.