
हिंदुस्थानला 1983 मध्ये पहिला वन डे विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचा आज वाढदिवस आहे. 6 जानेवारी 1959 ला चंदीगडमध्ये जन्मलेल्या कपिल देव यांनी वयाची साठी पार केली असून 64 व्या वर्षात पदार्पण केले आहे. जाणून घेऊया कपिल देव यांच्याबाबत खास गोष्टी…
कपिल देव यांचे पूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे आहे. 6 जानेवारी, 1959 ला चंदीगडमध्ये त्यांचा जन्म झाला.

कपिल देव यांनी वयाच्या 19 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यानंतर जवळपास 16 वर्षे आणि 16 दिवस कपिल देव यांनी हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये दणदणीत कामगिरी केली.

16 वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये कपिल देव हे तब्येतीच्या कारणामुळे एकाही लढतीला मुकले नाहीत. कपिल देव कधी अनफिटही झाले नाही आणि कधी दुखापतग्रस्तही झाले नाही. त्यांनी जवळपास 131 कसोटी सामने सलग खेळले.

131 कसोटी लढती खेळणारे कपिल देव त्यावेळी एकमेव अष्टपैलू खेळाडू होते. यात त्यांनी 400 पेक्षा जास्त बळी आणि 4000 पेक्षा जास्त धावांची नोंद केली.

कपिल देव हे एकेरी-दुहेरी धावा काढण्यातही माहीर होते. 131 कसोटीमधील 184 डावांमध्ये फलंदाजी करताना कपिल देव एकदाही धावबाद झाले नाही हे विशेष.

कपिल देव यांनी वयाच्या 27 वर्ष आणि दोन दिवसामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळींची नोंद केली होती. अशी कामगिरी करणारे कपिल देव त्यावेळचे एकमेव गोलंदाज होते.

हिंदुस्थानकडून एक दिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक ठोकण्याचा मानही कपिल देव यांना मिळाला. 1983 च्या विश्वचषकामध्ये कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध 175 धावांची खेळी केली होती. नेमके कॅमेरामन यावेळी आंदोलन करत असल्याने या लढतीचा ऑडिओ आणि व्हिडीओही उपलब्ध नाही.

कपिल देव यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध मागे पळत जात घेतलेल्या कॅचची विश्वचषकातील सर्वोच्च कॅचमध्ये गणना होती. या कॅचनंतर सामना फिरला आणि टीम इंडिया विश्वविजेता झाला.

कपिल देव क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे कर्णधार होते, मात्र 2008 मध्ये त्यांना पंजाब रेजीमेंटने लेफ्टनंट कर्नल ही पदवी देऊन त्यांना गौरव केला.

कपिल देव यांनी चित्रपटामध्येही काम केले आहे. ‘मुझसे शादी करोगी’, ‘इकबाल’, ‘आर्यन’ आणि ‘चैन कुली की मैन कुली’ या चित्रपटामध्ये ते दिसले आहेत.

1983 च्या विश्वचषकावर आधारित 83 हा चित्रपटही निघाला. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा कपिल देव यांच्या भूमिकेत दिसला.






























































