
सामना प्रतिनिधी। कराड
तारळे विभागात गटतट न पाहता चार वर्षात कोट्यावधी रूपयांची कामे केली आहेत. मात्र आता निवडणुका जवळ आल्याने विरोधकांकडून भूलथापा मारण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे यापासून सावध रहा. विकासकामे कोण करते आणि कोण भूलथापा मारतो ? हे ओळखून विकासकामे करणार्यांच्या पाठिशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
तारळे विभागात विविध विकासकामांच्या भूमिपुजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गजाभाऊ जाधव, अभिजीत पाटील, सोमनाथ खामकर, संजय देशमुख, अर्चना जरग, युवराज नलवडे, विकासराव जाधव, एम. डी. जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दुसाळे फाटा ते दुसाळे या रस्त्याच्या कामाला प्रारंभ, या रस्त्यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर तारळे येथील सभागृह आणि रस्ता डांबरीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. याशिवाय तोंडोशी व गोरेवाडीत येथे रस्ता डांबरीकरण, कोंजवडे येथील साकव पुलाचेही भूमिपुजन आ. शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देसाई म्हणाले, विकासकामात तारळे विभागाला झुकते माप दिले आहे. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत देसाई गटाची पिछेहाट झाली. काहीजण अमिषाला बळी पडल्याने पाटणकर गटाचे उमेदवार विजयी झाले. तेव्हापासून त्यांनी तुमची साधी विचारपूस तरी केली का ? असा प्रश्न उपस्थित करत आता विरोधकांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. कोणतोही भेदभाव न करता विकासकामे करण्यास आपले प्राधान्य असते. त्यामुळे कोणीही कसलेही काम घेऊन आले, तरी ते करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाहीही देसाई यांनी यावेळी दिली. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकार्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आता निवडणुकाजवळ आल्याने विरोधक विकासकामांना खो घालण्याचा प्रयत्न करतील, दिशाभूलही करतील, मात्र त्याला बळी पडू नका, असे आवाहनही देसाई यांनी यावेळी केले.
यावेळी गौरव परदेशी, भाऊसो जाधव, विठ्ठल जाधव, तुषार चव्हाण, बाळासाहेब सुर्यवंशी, मधूकर आरेकर, श्रीकांत जाधव यांचीही भाषणे झाली.

































































