कराड शहर पोलिस वाहतूक शाखेने केली 2 कोटी 15 लाख 52 हजार दंडाची वसुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

कराड शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेने 2020 या वर्षात 2 कोटी 15 लाख 52 हजार 600 रुपये दंडाची वसुली केली आहे. महिन्याकाठी पोलिसांनी 18 लाखांची वेगवेगळ्या कलमांन्वये कारवाई केली आहे. वर्षभरात पोलिसांनी 1 लाख 2 हजार 716 वाहनांवर कारवाई केली आहे.

मार्च ते सप्टेंबरअखेर लॉकडाउन काळामध्ये सर्वाधिक 28 लाख 39 हजार 600 रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. विनाकारण फिरणाऱ्या तब्बल 5 हजार दुचाकीही पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात जप्त केल्या होत्या. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात दंडाची वसुली करण्यात आली. जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत एक कोटी 56 लाख आठ हजार 700 इतक्‍या दंडाची वसुली केली आहे. सप्टेंबरपासून डिसेंबरअखेर तब्बल 60लाख 43 हजार 900 रुपयांचा दंड शासकीय तिजोरीत जमा केला. लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी तब्बल 11 हजार 299 नागरिकांवरील कारवाईतून 28 लाख 39 हजार 600 रुपयांच्या दंडाची वसुली केली.

विनामास्क, सोशल डिस्टन्स आदींच्या एक हजार 661 नागरिकांवर कारवाई झाली. यातून 8 लाख 34 हजारांचा दंड वसूल केला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 9 हजार 638 नागरिकांवर कारवाई केली. यातून 20 लाख 51 हजार 100 रुपयांच्या दंडाची वसुली झाली आहे. वाहतूक पोलिसांनी मागील वर्षी 2019 मध्ये डिसेंबरअखेर 80 लाख 59 हजार दंड वसुल केला होता. यंदा मात्र तोच दंडाचा आकडा 2 कोटींहून अधिक पार पाडला आहे, हाही एक विक्रमच आहे. मागील वर्षी कारवाई झालेल्या वाहनांची संख्या कमीच होती. यंदा 1 लाखाहून अधिक वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.