
सामना प्रतिनिधी । अक्कलकोट
मराठवाड्यात जसा बैलपोळा साजरा होतो, तसा सीमावर्ती महाराष्ट्र-कर्नाटक भागात कारहुणवी साजरी केली जाते. वर्षभरातून एकदा आवर्जून बैलांचे पूजन, त्यांना सजविणे, नैवेद्य दाखविणे व सवाद्य शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते.
कारहुणवीनिमित्त सध्या शहरातील बाजारपेठेत बैल सजविण्यासाठी झुले, बाशिंग, दोरे, कडे, घुंगरमाळ यासह विविध प्रकारचे बैलाला सजविण्याच्या साहित्याने अक्कलकोट बाजारपेठ सजली आहे. काल आठवडा बाजार असल्याने शेतकरीवर्गाने बैलांना सजविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. यंदा तालुक्यात बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी दिल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. यामुळे बैलांना वर्षातून एकदा सजविण्यासाठी यंदा शेतकरी कुठलीही कसर सोडणार नाही, अशी शक्यता आहे.
सलगर येथे शुक्रवारी २९ रोजी कारहुणवी
अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे कारहुणवी सण म्हणजे तालुकावासीयांना एक जत्रेची मोठी पर्वणीच असते. कारहुणवीनिमित्त येथे पंचक्रोशीतील बैल आकर्षक सजवून बैलगाडीला जुंपून प्रथम वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. गावातील हनुमान मंदिरास सजवलेल्या बैलगाडीने जलदगतीने फेऱ्या मारल्या जातात. जणू याकरिता स्पर्धा लागलेली असते.
या ढवळ्या-पोवळ्यांना वर्षातून एकदा पाण्याने स्वच्छ धुवून पिवळा आकर्षक रंग लावला जातो. शिंगांना लाल रंग, मोरपिसे, रिबीन, फुगे, टोकावर लिंबू, डोक्यावर बाशिंग, पोटावर काळे दोरे आणि झुल, गळ्यात सरगंट्या आणि घुंगरू लावून आकर्षक सजविले जाते. बळीराजाची अर्धांगिनीकडून बैलाला नैवेद्य पुरणपोळी भरविली जाते. जलकुंभाद्वारे जलार्पण करून बैलांची पंचारती केली जाते.































































