
कर्नाटक येथे लिंगायत समुदायातील एक संत मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. सोमवारी आपल्या आश्रमातच त्यांचा मृतदेह आढळला. ही घटना कर्नाटकच्या रामनगर येथे घडली आहे.
रामनगर येथील श्रीकंचुगल बंदे मठात लिंगायत संत बसवलिंगा स्वामी राहत होते. ते या मठाचे मुख्य पुजारी देखील होते. सोमवारी बसवलिंगा यांनी आपली खोली उघडली नाही. त्यामुळे मठातील इतर अनुयायांनी त्यांच्या दरवाजावर थाप दिली. त्यांच्या फोनवर फोन देखील केले. मात्र, त्यांचा काहीही प्रतिसाद आला नाही.
त्यामुळे काहीतरी अघटित घडल्याच्या भीतीने त्यांच्या शिष्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा त्यांच्या खोलीत बसवलिंगा यांचा मृतदेह होता. शिष्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना स्वामींच्या मृतदेहासोबत दोन पानी पत्रही सापडलं आहे.
तरीही पोलिसांनी अनैसर्गिक मृत्युची नोंद करून तपास सुरू केला आहे. अद्याप ही हत्या किंवा आत्महत्या आहे, याबाबत कोणताही खुलासा पोलिसांनी केलेला नाही. काही लोक स्वामींना गेल्या काही काळापासून मानहानी करण्याची धमकी देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बसवलिंगा स्वामी ज्या मठाचे पुजारी होते, तो 400हून अधिक जुना मठ आहे. ते गेल्या 25 वर्षांपासून बसवलिंगा स्वामी हे मठाधिपती होते.

























































