आंबाप्रेमी आजोबा, आंब्याच्या 120 जातींचे करताहेत संवर्धन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंब्याचा हंगाम सुरू झालाय. आंबाप्रेमींसाठी तर ही मोठी पर्वणी. अस्सल खवय्यांना तर कधी एकदा आंब्याची चव चाखतोय असं झालेलं असतं. कर्नाटकच्या अशाच एका आंबाप्रेमीने आंब्याच्या 120 जातींचे संवर्धन आपल्या बागेत केलेय. त्यासाठी ते वर्षानुवर्षे अनेक गावांमध्ये फिरले आहेत. त्यांचे नाव बी. व्ही. सुब्बाराव हेगडे असून ते 84 वर्षांचे आहेत. लहानपणी त्यांना आंब्याचे लोणचे खूप आवडायचे. ही आवड जपताना त्यांनी आंब्याच्या दुर्मिळ जातींची बाग साकारली आहे.

बी. व्ही. सुब्बाराव हेगडे कर्नाटकच्या शिवमोग्गा भागात राहतात. लहानपणापासून त्यांनी गावातील ‘अप्पे मिडी’ जातीचे आंबे खाल्ले आहे. ‘अप्पे मिडी’ आंबे हे लोणच्यासाठी वापरतात. सुब्बाराव सांगतात, त्यावेळी आमच्या घराजवळ आंब्याचे एकच झाड होते. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी घराजवळ देशी आंब्याचे झाड लावण्याचे ठरवले. अशा प्रकारे मागील काही वर्षांत मी विविध जातीच्या आंब्याची लागवड केली आहे.

हेगडे यांनी पश्चिम घाटातील आंब्याच्या जातींचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले. मागील 16 वर्षांपासून विविध गावांना ते भेटी देतात. आंब्याच्या ज्या जाती दुर्मिळ झाल्या आहेत, त्यांचे संवर्धन करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर फेअर 2021 मध्ये हेगडे यांना इनोव्हेटीव फार्मिंगसाठी सन्मानित करण्यात आले आहे

गावोगावी भटकंती

सुब्बाराव हेगडे देशी आंब्याच्या विविध जाती शोधण्यासाठी पश्चिम घाटातील विविध गावांमध्ये जातात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही असते. नोव्हेंबर ते मार्च या काळामध्ये त्यांनी विविध गावांना भेटी दिल्या. ते विविध प्रकारचे आंबे घरी आणतात आणि त्याची चव तपासून घेतात. सुब्बाराव सांगतात, मी झाडावर चढू शकत नाही. त्यामुळे कुणाची तरी मदत घेतो. मी आतापर्यंत जमवलेल्या 120 प्रकारच्या आंब्यापैकी 15 प्रकारचे आंबे दीर्घकाळ ठेवता येतात.

  • सुब्बाराव हेगडे यांनी घराजवळ छोटी बाग तयार केलेय. विविध जातींचे आंबे बागेत असल्याचा दावा सुब्बाराव करतात. जागेच्या कमतरतेमुळे त्यांनी ‘अप्पे मिडी’ (लोणच्यासाठी वापरला जाणारा आंबा) आंब्याच्या प्रत्येक झाडावर पाच प्रकारच्या आंब्यांचे कलम केले आहे.